मनोज जरांगेंकडून आंदोलनाची हाक
येत्या 29 ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलन करणार
नागपूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. या सरकारकडून मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे, असे म्हणत त्यांनी 58 लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी येत्या 29 ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलन करणार असल्याची हाक अंतरवली सराटी येथून दिली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळते आणि ज्या-ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले आहे, त्यांना ते मिळाले आहे. माझ्या माहितीप्रमाणे प्रलंबित जात प्रमाणपत्रांची संख्या कमी आहे. कोणी जात प्रमाणपत्र मागतेय आणि देत नाही, अशी परिस्थिती नाही. मला वाटते, प्रलंबित जात प्रमाणपत्रांची संख्या कमी आहे. कारण जात प्रमाणपत्र दिली जात आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की, आमच्या महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले, हे कुठल्याही सरकारने घेतले नाहीत. अद्यापही कोणाचा काही दोष असेल, कोणाला काही वाटत असेल की, हे योग्य होत नाही. तर निश्चित त्यातून मार्ग काढता येईल. त्या सर्व गोष्टी आपल्याला बघता येतील आणि मला वाटतं त्यावर योग्य पद्धतीने मार्ग काढता येईल.
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला जाणीवपूर्वक वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या या लढ्याला येत्या 29 ऑगस्टला बरोबर 3 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करूनही अद्याप प्रमाणपत्रे का वाटली नाहीत? सरकार मराठ्यांनाच लक्ष्य का करत आहात? असे प्रश्न उपस्थित करत मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजातील मुलांचे सध्या मोठे हाल होत आहेत. त्यांच्या भविष्यासाठी आपण गेल्या तीन वर्षांपासून रक्त आटवत आहोत. सरकारने आधी स्थानिक चौकशी अहवाल आणला, मात्र तरीही मराठ्यांनाच लक्ष्य का केले जात आहे? त्यामुळे आता हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रे पदरात पाडून घेतल्याशिवाय आपण कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. येत्या सरकारने 28 ऑगस्टपर्यंत 58 लाख नोंदी सापडलेल्या बांधवांना प्रमाणपत्रे द्यावीत, अन्यथा 29 ऑगस्टपासून तुकडा पडेपर्यंत आमचे शेवटचे आणि निर्णायक आंदोलन सुरू होईल, असा अल्टिमेटम त्यांनी दिला. तसेच 29 ऑगस्टचे आंदोलन हे आरक्षणाच्या लढाईतील शेवटचे पाऊल असणार आहे. त्यामुळे या निर्णायक आंदोलनात समाजातील एकानेही घरी थांबू नये, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलन करतात का? हे पाहावे लागेल.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
पत्रकार कविराज चव्हाण यांना ठामपाचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कार
02 Oct 2026
ठाण्यात पारंपरिक कारागिरांच्या कौशल्य व आर्थिक विकासाला गती
16 Sep 2026
आदिवासी समाजाच्या हक्काचे रक्षणासाठी मुंबईत बैठक
15 Sep 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार
15 Sep 2026