Site Logo
मुंबई

पत्रकार कविराज चव्हाण यांना ठामपाचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कार

प्रकाशित: 02 Oct 2026, 01:57 PM
18 Views
Featured News Image

ठाणे : बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्यासह महिला घरकामगार आणि गरजू रुग्णांना आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करणारे पत्रकार तथा धर्मादाय रुग्णालय देखरेख समिती, महाराष्ट्र शासनाचे मुंबई प्रतिनिधी कविराज चव्हाण यांना यंदाचा ठाणे महानगरपालिकेचा प्रतिष्ठित ‘ठाणे गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळोळकर, खासदार नरेश म्हस्के आणि ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांच्या हस्ते कविराज चव्हाण यांना पुरस्काराचे मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

     पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत ठाणे महानगरपालिकेने कविराज चव्हाण यांची ‘ठाणे गौरव’ पुरस्कारासाठी निवड केली. ठाण्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत त्यांनी गेल्या वर्षी समाजाच्या सहकार्याने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो नागरिकांचा मोर्चा काढला होता. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या सहकार्याने कामगार व घरकामगारांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मदत मिळवून देणे, तसेच ठाणे व मुंबई शहरातील नागरी, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांचे सातत्याने वृत्तांकन करून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे.

     कविराज चव्हाण यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील या योगदानाचा गौरव ‘ठाणे गौरव’ पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोळकर, खासदार नरेश म्हस्के, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, आमदार रवींद्र फाटक,अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना गटनेते पवन कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

#newsdisha #thane #thanekar #mumbai #ठाणे

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: