ठाण्यात पारंपरिक कारागिरांच्या कौशल्य व आर्थिक विकासाला गती
ठाणे जिल्ह्यात 'प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना' प्रभावीपणे कार्यान्वित
ठाणे : पंतप्रधान महोदयांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्ह्यात 'प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना' अंतर्गत विशेष लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पारंपरिक कारागीर व हस्तकला व्यावसायिकांना कौशल्य विकास, आधुनिक साधने, सुलभ कर्ज सुविधा आणि बाजारपेठेशी जोडणी उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा मानस आहे.
योजनेची पार्श्वभूमी व व्याप्ती :- ठाणे जिल्ह्यात दिनांक १७ सप्टेंबर २०२३ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४३१ ग्रामपंचायती तसेच १० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद) माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.
या योजनेअंतर्गत खालील १८ पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे.
• सुतार, सोनार, लोहार, मोची, गवंडी, मूर्तिकार
• धोबी, शिंपी, कुंभार, न्हावी, हार-तुरे तयार करणारे
• विणकर, चटई व झाडू बनविणारे, दोऱ्या वळणारे
• होड्या बांधणारे, मासेमारीचे जाळे विणणारे, कुलूप तयार करणारे आणि पारंपरिक खेळणी बनवणारे कारागीर.
ठाणे जिल्ह्यातील सद्यस्थिती व प्रगती
ठाणे जिल्ह्यात या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंतची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे:
• एकूण प्राप्त अर्ज : ३६,७८४
• पात्र ठरवून शिफारस केलेले अर्ज : १४,९०० (जिल्हा समितीमार्फत)
• प्राथमिक प्रशिक्षणासाठी पाठवलेले अर्ज : १,३०३ (एम.एस.एम.ई. विभागामार्फत)
• प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झालेले लाभार्थी : ९०४
• मंजूर व वितरित कर्ज : १५८ लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी १३६ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कर्ज वाटप झाले आहे.
• टुलकीट वाटप : ३१८ लाभार्थ्यांना टुलकीटचे वाटप करण्यात आले आहे.
योजनेचे प्रमुख लाभ व तरतुदी
पारंपरिक कारागिरांना सक्षम बनवण्यासाठी या योजनेत खालील सवलती व प्रोत्साहन दिले जाते:
1. कौशल्य प्रशिक्षण : प्रशिक्षण कालावधीत दररोज ५००/- रुपये प्रशिक्षण भत्ता दिला जातो.
2. टुलकीट प्रोत्साहन : कौशल्य पडताळणीनंतर आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी १५,०००/- रुपयांपर्यंतचे टुलकीट प्रोत्साहन दिले जाते.
3. सुलभ कर्ज सुविधा : व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तारणमुक्त व सवलतीच्या दरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
4. डिजिटल व्यवहार प्रोत्साहन : डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी विशेष सहाय्य दिले जाते.
लाभार्थी मेळाव्याचे महत्त्व : मा. पंतप्रधान महोदयांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या लाभार्थी मेळाव्यात योजनेतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि योजनेच्या पुढील टप्प्याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. पारंपारिक कारागिरांच्या कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे उत्पन्न व व्यवसायाच्या संधी वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ठाणे रमेश सुरुंग यांनी कळविले आहे.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
पत्रकार कविराज चव्हाण यांना ठामपाचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कार
02 Oct 2026
आदिवासी समाजाच्या हक्काचे रक्षणासाठी मुंबईत बैठक
15 Sep 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार
15 Sep 2026
सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज
15 Sep 2026