Site Logo
मुंबई

सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज

प्रकाशित: 15 Sep 2026, 03:36 PM
45 Views
Featured News Image

नियोजन वेळेत पूर्ण करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे निर्देश

ठाणे : राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी आज, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले.

       अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शोभा शेलार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच सर्व तालुका विभाग प्रमुख उपस्थित होते.

       ‘सेवा संकल्प अभियान’ हे नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असून, अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुका स्तरावर ‘सेवा सेतू’ अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करून पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचे थेट लाभ उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत.

      अभियानाच्या अनुषंगाने ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत गाव व वाडी स्तरावर युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागातून स्थानिक गरजेनुसार रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, योग-ध्यान, प्लास्टिकमुक्ती, महिला आरोग्य व स्वच्छता, पोषण व अॅनिमिया जनजागृती, जलसंधारण, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग, सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा, दिव्यांगजन सहकार्य, मतदार जागृती आणि शासकीय योजनांची माहिती यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील या उपक्रमांसाठी गट विकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

    तसेच ‘सेवा ज्योत यात्रा’, ‘चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा’, ‘अंगणवाडी उत्सव’, ‘आशीर्वादाचा दिवा’ आणि ‘बदलाची गोष्ट’ यांसारख्या उपक्रमांचेही नियोजन करण्यात येणार आहे. अंगणवाडी उत्सवामध्ये माता व बालकांना सहभागी करून आरोग्य व पोषण योजनांची माहिती देणे, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करणे तसेच लाभार्थी महिलांना योजनांचा झालेला लाभ मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.

 शासनाच्या विविध योजनांमुळे नागरिकांच्या जीवनमानात झालेला सकारात्मक बदल ‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमातून यशोगाथांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच ‘नमो सेवागाथा’ अंतर्गत शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायत स्तरावर कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

या सर्व उपक्रमांचे विभागनिहाय नियोजन, तालुकानिहाय जबाबदाऱ्या, आवश्यक मनुष्यबळ, लाभार्थ्यांची माहिती, प्रसिद्धी-प्रसार तसेच उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ व अहवाल यांचे संकलन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दिले. अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ व रील्स संकलित करून माहिती व जनसंपर्क विभागास उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

०००

Author

News Disha

लेखक / संपादक

राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक

ही बातमी शेअर करा: