सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला ‘प्रगती’चा बूस्टर
४२५० कोटींच्या प्रकल्पातून प्राथमिक ते तृतीयस्तरीय आरोग्यसेवा होणार सक्षम
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि लोकाभिमुख करण्यासाठी ‘प्रगती’ (PRAGATI – Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration) या सर्वसमावेशक आरोग्य सुधारणा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची सुधारित किंमत ४२५० कोटी रुपये असून, त्यापैकी २९७५ कोटी रुपये एशियन डेव्हलपमेंट बँकेचे (ADB) कर्ज, तर १२७५ कोटी रुपये राज्य शासनाचा निधी असणार आहे.
प्राथमिक, द्वितीय आणि तृतीयस्तरीय आरोग्य संस्थांना एकात्मिक पद्धतीने बळकटी देणे, असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, तपासणी, लवकर निदान व उपचार, अत्याधुनिक डिजिटल आरोग्य व्यवस्था, प्रभावी संदर्भ सेवा साखळी, आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि नागरिकांचा आरोग्यावरील स्वखर्च कमी करणे, ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
प्राथमिक आरोग्यसेवेपासून तृतीयस्तरीय उपचारांपर्यंत एकात्मिक व्यवस्था
‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत राज्यातील आरोग्य संस्थांची क्षमता वाढविण्यासोबतच प्राथमिक स्तरावर आजारांचे प्रतिबंध, तपासणी आणि लवकर निदान यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिरे, शहरी आरोग्य केंद्रे तसेच द्वितीय व तृतीयस्तरीय आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक उपकरणे, मनुष्यबळ, औषधे आणि निदान साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्राथमिक स्तरावर निदान झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य वेळी उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भित करता यावे आणि उपचारानंतर पुन्हा स्थानिक आरोग्य संस्थेशी त्यांचा समन्वय राहावा, यासाठी प्रभावी संदर्भ व प्रत्यावर्तन (Referral and Return Linkage) व्यवस्था विकसित केली जाणार आहे.
उच्च रक्तदाब, मधुमेहापासून कर्करोगापर्यंत विशेष लक्ष
राज्यात वाढत असलेल्या असंसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पात उच्च रक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात, दीर्घकालीन फुफ्फुसाचे विकार, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, मधुमेह, बालवयीन आजार, कर्करोग, मानसिक आरोग्य आणि उपशामक आरोग्य सेवा यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.यासाठी आरोग्य संस्थांची गरज निश्चित करून त्यानुसार तपासणी उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. आवश्यक औषधे व निदान साहित्याचा अखंडित पुरवठा सुनिश्चित केला जाणार असून, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
‘महाराष्ट्र हेल्थ टेक्नॉलॉजी मिशन’ला बळ
आरोग्यसेवा अधिक तंत्रज्ञानाधारित, कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी ‘महाराष्ट्र हेल्थ टेक्नॉलॉजी मिशन’ मजबूत करण्यात येणार आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनशी सुसंगत अशी डिजिटल आरोग्य व्यवस्था विकसित केली जाणार आहे.यामध्ये ऑनलाइन रुग्ण नोंदणी, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण व्यवस्थापन, डिजिटल प्रयोगशाळा अहवाल, डिजिटल औषध वितरण, डिजिटल प्रिस्क्रिप्शन, संदर्भ व प्रत्यावर्तन व्यवस्था, डिस्चार्ज सारांश, इलेक्ट्रॉनिक आरोग्य अभिलेख आणि वैयक्तिक आरोग्य अभिलेख यांचा समावेश असेल.कृत्रिम बुद्धिमत्ता, टेलिमेडिसिन, प्रगत निदान सुविधा आणि नवीन उपचार पद्धतींचाही प्रभावी वापर करण्याचे नियोजन आहे.
कोल्हापूर, नांदेडसह पाच ठिकाणी मोठ्या रुग्णालयांची उभारणी
‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास केला जाणार आहे. आवश्यकतेनुसार डीपीआर, डिझाइन, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, बांधकाम आणि गुणवत्ता नियंत्रण यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
प्रकल्पांतर्गत प्रस्तावित प्रमुख पायाभूत सुविधा :
- कोल्हापूर : ५०० खाटांचे रुग्णालय
- नांदेड : ५०० खाटांचे रुग्णालय
- नागपूर : १०० खाटांवरून ३०० खाटांचे जिल्हा रुग्णालय
- लातूर : १०० खाटांवरून ३०० खाटांचे जिल्हा रुग्णालय
- पुणे : २०० खाटांचे विश्वस्तरीय संदर्भ सेवा रुग्णालय
या पायाभूत सुविधांमुळे नागरिकांना त्यांच्या जवळच अधिक गुणवत्तापूर्ण आणि आवश्यक त्या स्तरावरील आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
आजार होण्यापूर्वीच प्रतिबंधावर भर
‘प्रगती’ प्रकल्पाचे वैशिष्ट्य केवळ रुग्णालये आणि उपकरणांपुरते मर्यादित नसून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि नागरिकांच्या वर्तनातील सकारात्मक बदल यावरही मोठा भर देण्यात आला आहे.सामाजिक व वर्तणूक बदल संवादाच्या (SBCC) माध्यमातून नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. तंबाखू व मद्य सेवन टाळणे, नियमित व्यायाम, संतुलित आहार, उच्च रक्तदाब व मधुमेहाची नियमित तपासणी, कर्करोगाची तपासणी, आजाराचे लवकर निदान आणि उपचारांचे नियमित पालन याबाबत व्यापक जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
आरोग्यावरील स्वतःच्या खिशातील खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट
प्राथमिक स्तरावरच तपासणी, लवकर निदान आणि वेळेवर उपचार उपलब्ध करून देत नागरिकांचा आरोग्यावरील स्वखर्च (Out-of-Pocket Expenditure) कमी करण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पातून ठेवण्यात आले आहे. विशेषतः असंसर्गजन्य आजार आणि कर्करोगाच्या प्रतिबंधात्मक तपासणी व उपचार सुविधा सक्षम झाल्यास आजाराचे गंभीर स्वरूप टाळण्यास मदत होणार आहे.
मनुष्यबळाच्या क्षमता विकासालाही प्राधान्य
आरोग्य सुविधांसोबतच त्या सुविधा प्रभावीपणे देणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावरही प्रकल्पात भर देण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी व कौशल्यविकास कार्यक्रम राबविले जातील.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती
‘प्रगती’ प्रकल्पाच्या धोरणात्मक मार्गदर्शन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती प्रकल्पाच्या धोरणात्मक अंमलबजावणीला दिशा देणे, विविध विभाग व अंमलबजावणी यंत्रणांमध्ये समन्वय साधणे, वार्षिक कृती आराखडा तयार करणे, अडचणींचे निराकरण करणे तसेच प्रकल्पाच्या आर्थिक व भौतिक प्रगतीचा त्रैमासिक व वार्षिक आढावा घेण्याचे काम करणार आहे.
स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन कक्ष
प्रकल्पाचे सनियंत्रण, आर्थिक व तांत्रिक मार्गदर्शन तसेच एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) यांच्याशी समन्वय साधण्यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (Project Management Unit) कार्यरत राहणार आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा
‘प्रगती’ प्रकल्पामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला केवळ पायाभूत सुविधांचे बळ मिळणार नसून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, लवकर निदान, वेळेवर उपचार, डिजिटल आरोग्य, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि नागरिकांचा सहभाग यांचा एकत्रित मेळ साधला जाणार आहे.आरोग्यसेवेची गुणवत्ता, कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासोबतच नागरिकांना त्यांच्या जवळच अधिक सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २०२६ ते २०३१ या कालावधीत राबविण्यात येणारा ४२५० कोटी रुपयांचा ‘प्रगती’ प्रकल्प महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या भविष्यातील परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा आहे.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषक
संबंधित बातम्या
पत्रकार कविराज चव्हाण यांना ठामपाचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कार
02 Oct 2026
ठाण्यात पारंपरिक कारागिरांच्या कौशल्य व आर्थिक विकासाला गती
16 Sep 2026
आदिवासी समाजाच्या हक्काचे रक्षणासाठी मुंबईत बैठक
15 Sep 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार
15 Sep 2026