स्तन कर्करोग तपासणी शिबिर ; २७,८६६ महिलांची तपासणी १,२७६ महिलांमध्ये संशयित लक्षणे
लक्षणे आढळलेल्या महिलांचे पुढील उपचार पूर्णपणे मोफत : हरिष भांदिर्गे
मुंबई (कविराज चव्हाण ) : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!' या ध्येयवाक्याखाली बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत संपूर्ण मुंबईमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाअभियानाला मुंबईकर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३० वर्षांवरील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महाअभियानात शहरभरातील २९८ तपासणी केंद्रांवर एकूण २७ हजार ८६६ महिलांनी स्तन कर्करोग तपासणी करून घेतली.महिलांमध्ये स्तन कर्करोगाविषयी जनजागृती करण्याबरोबरच वेळेत निदान होऊन आवश्यक उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
तपासणीदरम्यान १,२७६ महिलांमध्ये पुढील वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. या सर्व महिलांना त्यांच्या संबंधित विभागातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी (MOH) यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या जवळच्या रुग्णालयात मोफत मॅमोग्राफी तपासणी करून दिली जाणार असून, आवश्यकतेनुसार त्यांच्यावरील संपूर्ण उपचारही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.हे महाअभियान यशस्वी करण्यासाठी ३६० हून अधिक डॉक्टर, ९०० हून अधिक पॅरामेडिकल कर्मचारी तसेच २,५०० हून अधिक सामुदायिक आरोग्य स्वयंसेवक (CHV) आणि आशा सेविकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर महिलांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे शक्य झाले.
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, स्तन कर्करोगाचे लवकर निदान करून मृत्यूदर कमी करणे आणि प्रत्येक महिलेला वेळेत व मोफत उपचार उपलब्ध करून देणे, या उद्देशाने राबविण्यात आलेले हे महाअभियान बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेतील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे.
महाअभियानाची ठळक आकडेवारी :
* एकूण तपासणी केंद्रे : २९८
* तपासणी केलेल्या महिला : २७,८६६
* पुढील तपासणी आवश्यक असलेल्या महिला : १,२७६
* सहभागी डॉक्टर : ३६० हून अधिक
* पॅरामेडिकल कर्मचारी : ९०० हून अधिक
* CHV व आशा सेविका : २,५०० हून अधिक
* मॅमोग्राफी व आवश्यक उपचार : मुंबई महानगरपालिकेमार्फत पूर्णपणे मोफत
यावेळी माध्यमांशी बोलताना आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे म्हणाले की 'महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळाला. अनेक महिला मुंबईकरांनीही वेळात वेळ काढून तपासणी शिबिरामध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार!' ज्या १,२७६ महिलांमध्ये संशयित लक्षणे आढळली आहेत, त्या सर्व महिलांची पुढील तपासणी त्यांच्या जवळच्या पालिका रुग्णालयात केली जाणार आहे. तर गरज वाटल्यास त्या महिलांचे समुपदेशन केले जाणार आहे.
News Disha
लेखक / संपादक
राजकारण, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या बातम्यांचे विश्लेषण.
संबंधित बातम्या
स्वित्झर्लंडमध्ये ठाण्याच्या जलतरणपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताला प्रथमच रौप्यपदक
27 Jul 2026
११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप
27 Jul 2026
'धर्मवीर चषक २०२६' पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ!
25 Jul 2026